citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

खापरखेड्यात मध्यरात्री गँगवार; सोशल मीडिया चॅलेंजवरून दोन गट आमनेसामने

चाकू, तलवारी आणि काठ्यांनी हल्ला; तिघे जखमी, १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे जुन्या वैमनस्यातून आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चॅलेंजच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये मध्यरात्री भीषण गँगवार झाली. चाकू, तलवारी आणि काठ्यांसह आमनेसामने आलेल्या दोन्ही गटांमध्ये झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाले असून, पोलिसांनी १२ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री खापरखेड्यातील नागमंदिर चौक परिसरात ही घटना घडली. जुन्या वादातून आणि सोशल मीडियावरील चॅलेंजमुळे दोन्ही गट आमनेसामने आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

प्रज्वल जाणे आणि त्याच्या मित्रांवर सूरज कावळे व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रक्षित कापसे याला लक्ष्य करून मारहाण करण्यात आली. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या हिमांशू कडूवर चाकूने वार करण्यात आले, तर रोहित मेश्राम हाही जखमी झाला.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर काही वेळाने त्यांनी हिमांशू कडूचा त्याच्या घराजवळ पाठलाग करून पुन्हा हल्ला केल्याची माहितीही समोर आली आहे.

या घटनेनंतर खापरखेडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

प्रज्वल जाणे यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी सूरज कावळे आणि त्याच्या ११ साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button