citynewsLatest NewsMaharashtraRaigad

खोपोलीतील केपी वॉटरफॉलवर ट्रेकिंगदरम्यान तरुणाचा दरीत पडून मृत्यू

रात्रभर सुरू राहिलेल्या शोध मोहिमेनंतर आठ तासांनी मृतदेह बाहेर; पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकिंगचे आवाहन

रायगड | प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणाचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. पावसाळ्यात निसरड्या मार्गावर घडलेल्या या दुर्घटनेनंतर हेल्प फाउंडेशन आणि स्थानिक युवकांनी रात्रभर शोधमोहीम राबवून तब्बल आठ तासांच्या प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.

मृत तरुणाचे नाव अभिषेक कुसवाह (वय २३) असे असून, तो रविवारी आपल्या तीन मित्रांसह खोपोलीजवळील केपी वॉटरफॉल परिसरात फिरण्यासाठी गेला होता. संध्याकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास निसरड्या वाटेवरून जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला.

घटनेनंतर त्याच्या मित्रांनी स्वतः शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना यश आले नाही. त्यानंतर हेल्प फाउंडेशनला घटनेची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि स्थानिक युवक घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस, अंधार आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीतही त्यांनी रात्रभर शोधमोहीम सुरू ठेवली. अखेर पहाटे सुमारे तीन वाजता अभिषेकचा मृतदेह दरीत आढळून आला. त्यानंतर खडतर बचावकार्य करून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

हेल्प फाउंडेशनने सांगितले की, अपघाताची माहिती वेळेत मिळाली असती, तर तातडीने वैद्यकीय मदत पोहोचवण्याची शक्यता निर्माण झाली असती. या घटनेनंतर पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी सुरक्षा साधनांशिवाय ट्रेकिंग टाळावे, तसेच कोणतीही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे पावसाळी पर्यटनादरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button