AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत अतिक्रमण कारवाईदरम्यान हायव्होल्टेज ड्रामा; दुकानदाराचा पाण्याच्या टाकीवर चढून गॅस सिलेंडरचा स्फोट

अमरावती : शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान गुरुवारी मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. महानगरपालिकेच्या कारवाईला विरोध करत एका दुकानदाराने गॅस सिलेंडरसह पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की, त्याने पेटवलेला सिलेंडर खाली फेकताच मोठा स्फोट झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

नागरिकांच्या तक्रारीनंतर अमरावती महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी सकाळपासून म्हाडा कॉलनी परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले खोके, अवैध बांधकामे आणि इतर अतिक्रमणे हटविण्यात आली.

या कारवाईदरम्यान शिवा परळकर या दुकानचालकाने आपल्या पत्नीसह तीव्र विरोध दर्शविला. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

मात्र, सायंकाळी परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले. संबंधित दुकानदार गॅस सिलेंडर घेऊन परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढला आणि “माझे दुकान पूर्ववत करून द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील,” अशी घोषणाबाजी करत प्रशासनाला आव्हान देऊ लागला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा, क्यूआरटी पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो खाली उतरण्यास तयार नव्हता.

रात्री सुमारे ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास परिस्थिती अधिकच गंभीर झाली. त्याने सोबत आणलेल्या सिलेंडरचे रेग्युलेटर पेटवून सिलेंडर खाली फेकला. यामुळे मोठा स्फोट झाला आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळानंतर संबंधित व्यक्ती खाली उतरला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र पोलीस अंतर्गत खोलापुरी गेट पोलीस करत आहेत. प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव कारवाईला विरोध करत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button