धन्वंतरी सहकारी रुग्णालय निवडणुकीत रंगत; ६ उमेदवार बिनविरोध, १२ जण मैदानात

अमरावतीतील धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळ निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच मोठी राजकीय आणि प्रशासकीय चुरस पाहायला मिळत आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
यंदाच्या निवडणुकीत एकूण १८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित १२ उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील ६ उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने निवडणुकीतील पहिला टप्पा शांततेत पार पडला असला, तरी उर्वरित १२ जागांसाठी आता चुरशीची लढत होणार आहे. या निवडणुकीत एकूण २८७३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विशेष म्हणजे, धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या इतिहासात यापूर्वी संचालक मंडळाची निवड नेहमी बिनविरोध होत आली होती. मात्र यंदा प्रथमच निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याने या निवडणुकीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्य सरकारच्या सहकारी संस्थेमार्फत ही निवडणूक होत असून उमेदवारांकडून रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याचे, रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे मतदारांमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी विद्यमान संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत आणि निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंतीही करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला डॉ. प्रमोद झाडे, ओंकार बँड, अशोक ठाकरे, अजय दातेराव, गजानन रडके, राजेश गोयंका, प्रतापराव भुयार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या या ऐतिहासिक निवडणुकीत अखेर कोण बाजी मारणार, याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.



