citynewsLatest NewsMaharashtra

एसटी बसमध्ये चोरट्यांचा डाव उधळला; महिलेच्या सतर्कतेमुळे दागिने चोरीचा प्रयत्न फसला

लग्नसराईच्या हंगामात एसटी बसमध्ये वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अकोट–दर्यापूर–नागपूर मार्गावरील एसटी बसमध्ये एका महिलेच्या बॅगेतील दागिने आणि रोकड चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. मात्र महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

४ मे रोजी दुपारी अकोट–दर्यापूर–नागपूर मार्गावरील एसटी बस क्रमांक MH 14 MT 0869 मध्ये हा प्रकार घडला. दर्यापूर ते खोलापूर दरम्यान प्रवास सुरू असताना प्रचंड गर्दीचा फायदा घेत पाच जणांची टोळी बसमध्ये चढली.

यातील एका चोरट्याने अत्यंत चलाखीने महिलेच्या बॅगेचे कुलूप उघडत सोन्याचे दागिने आणि रोकड स्वतःच्या बॅगेत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार तात्काळ उघडकीस आला.

महिलेने तत्काळ आरडाओरडा करताच बसमधील प्रवासी सतर्क झाले. बस चालक, वाहक आणि उपस्थित पोलीस शिपायाने तातडीने 112 वर कॉल करत पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलीस स्टेशनची टीम काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाचही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, संतप्त महिलांनी पकडलेल्या चोरट्याला चांगलाच धडा शिकवला. महिलेच्या धाडसामुळे मोठा आर्थिक फटका टळला आणि चोरट्यांची टोळी रंगेहाथ पकडली गेली.

लग्नसराईच्या हंगामात बसस्थानक आणि एसटी बसमध्ये वाढणारी गर्दी पाहता अशा घटना वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

बस प्रवासादरम्यान आपल्या बॅग, पर्स आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या, कारण चोरटे आता गर्दीचा फायदा घेत अधिक हुशारीने डाव आखत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button