नसरापूर अत्याचारप्रकरणी अमरावतीत महिला काँग्रेस आक्रमक; सरकारच्या संवेदनशीलतेवर सवाल

पुण्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावरून अमरावतीत महिला काँग्रेस आक्रमक झाली असून सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
अमरावती महिला काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहराध्यक्ष जयश्री वानखडे यांनी सरकारवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जयश्री वानखडे म्हणाल्या, पुण्यातील एका मोठ्या लग्न समारंभाला सत्ताधारी नेते उपस्थित राहतात, मात्र अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे.
“जनतेच्या दु:खात सहभागी होण्याची जबाबदारी सरकारची नाही का?” असा थेट सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला. या प्रकरणात सरकारची भूमिका असंवेदनशील असल्याचा आरोपही महिला काँग्रेसकडून करण्यात आला.
महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
अमरावती महिला काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता सरकार या प्रकरणात किती तत्परतेने कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



