“पुसदमध्ये फटाक्यांनी भरलेले वाहन पेटले; सुदैवाने जीवितहानी टळली, मोठे नुकसान”

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात एक धक्कादायक घटना घडली असून फटाक्यांनी भरलेल्या छोटा हत्ती वाहनाला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुंजहून पुसदकडे येणाऱ्या वाहनाला अचानक आग लागली. वाहनात मोठ्या प्रमाणात फटाके असल्याने काही क्षणांतच आग भडकली आणि एकामागून एक स्फोट होऊ लागले. त्या वेळी पुसद शहरातील तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचले होते. उष्णतेमुळेच आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटना घडताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ वाहन सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र फटाके फुटू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे पुसद–माहूर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडीही झाली.
माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन आणि त्यातील फटाक्यांचा मोठा साठा जळून खाक झाला.
या घटनेमुळे फटाक्यांची वाहतूक करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.



