“अमरावतीत कचऱ्याचं साम्राज्य; नवसारी–जमील कॉलोनीतील स्वच्छता प्रश्न तीव्र, नागरिक संतप्त”

अमरावती शहरातील पश्चिम क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 3 नवसारी आणि प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलोनी येथे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
रस्ते, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक दिवसांपासून नियमित साफसफाई होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. काही ठिकाणी तर नवसारी परिसर कचऱ्याच्या डेपोमध्ये रूपांतरित झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये एमआयएमचे चार नगरसेवक निवडून आले असतानाही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तर प्रभाग क्रमांक 3 नवसारीमध्ये काँग्रेसचे तीन आणि भाजपचा एक नगरसेवक असूनही परिस्थितीत कोणताही सुधार दिसत नाही. त्यामुळे “निवडून दिलेले प्रतिनिधी नेमकं काय करत आहेत?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर स्वच्छतेची व्यवस्था न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
अमरावतीतील या गंभीर स्वच्छता प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार, आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



