बैलवाड्यात मध्यरात्री चोरीचा थरार | महिलेच्या धाडसामुळे मोठी चोरी टळली

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बैलवाडा गावात मध्यरात्री सुमारे एक वाजताच्या सुमारास चोरीचा धक्कादायक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने सर्वप्रथम तेजराव जुमडे आणि चक्रधर चिखले यांच्या घरांचे दरवाजे बाहेरून बंद केले, जेणेकरून कोणीही बाहेर येऊ शकणार नाही.
यानंतर चोर भूजंगराव ठाकरे यांच्या घराच्या स्वयंपाकघराची खिडकी फोडून आत शिरला आणि घरातील कपाट उघडण्याचा प्रयत्न करू लागला.
याचवेळी घरातील एका महिलेची झोप उघडली. सुरुवातीला काहीतरी आवाज होत असल्याचा संशय आला. मात्र समोर चोर उभा असल्याचे लक्षात येताच त्यांनी धैर्य दाखवत आपल्या मुलाला मोठ्याने हाक मारली.
महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी जमा झाले. गावकऱ्यांची गर्दी होत असल्याचे पाहून चोर घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला.
दरम्यान, चोरट्याने सुरेश ठाकरे यांच्या घराच्या दरवाज्याची आतील कडी तोडण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संशयित चोर टक्कल असलेला असून त्याने केवळ अंतर्वस्त्र परिधान केले होते.
घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस ठाण्याचे पीएसआय विलास करमांगी यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
या संपूर्ण घटनेत गावातील युवक आणि नागरिकांनी दाखविलेली सतर्कता व एकजूट यामुळे संभाव्य मोठी चोरी टळल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.



