“आंबेडकर अवमान प्रकरणात तणाव निवळला; कंटेंट क्रिएटरची जाहीर माफी, भिमसैनिकांनी घेतली शांततेची भूमिका”

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सोशल मीडियावरून कथित आंबेडकर अवमान प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव अखेर निवळला आहे. “देव फ्राम अमरावती” या आयडीवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर संतप्त भिमसैनिकांनी लोणी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला होता.
या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडत संबंधित व्हिडिओ व्हायरल करणारा देवांश नावाचा कंटेंट क्रिएटर बुद्ध विहारात दाखल झाला. येथे त्याने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि संपूर्ण आंबेडकरी समाजाची जाहीर माफी मागितली.
या माफीनाम्यानंतर संतप्त भिम अनुयायांनी शांततेची भूमिका घेतली असून परिसरातील तणावपूर्ण वातावरण हळूहळू निवळताना दिसत आहे. दरम्यान, या घटनेनंतर मोठ्या संख्येने भिमसैनिक लोणी पोलीस ठाण्यात जमा झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही मजकूर किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत.
एका व्हिडिओमुळे निर्माण झालेला तणाव माफी आणि समजुतीने निवळल्याचे या घटनेतून दिसून आले. मात्र सोशल मीडियावर जबाबदारीने वागण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.



