कोडगूमधील होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार; कर्मचारी आणि मालक अटकेत

कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील कुट्टा येथील एका होमस्टेमध्ये राहणाऱ्या अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी होमस्टेतील एका कर्मचाऱ्यासह मालकाला अटक केली असून, घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन येथील ही महिला कोडगूमधील कुट्टा गावात पर्यटनासाठी आली होती आणि एका खासगी होमस्टेमध्ये राहत होती. आरोपानुसार, होमस्टेतील कर्मचारी वृजेश कुमार याने महिलेच्या पेयामध्ये नशेचे पदार्थ मिसळले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, होमस्टेचा मालक विशाल पोनप्पा याने महिलेची मदत करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने मदतीसाठी संपर्क साधू नये म्हणून होमस्टेतील वाय-फाय तीन दिवस बंद ठेवण्यात आले, तसेच तिचा मोबाईलही ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महिला नंतर म्हैसूरला पोहोचल्यानंतर तिने अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधला. दूतावासाकडून माहिती मिळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. त्यानंतर मुख्य आरोपी वृजेश कुमार आणि होमस्टे मालक विशाल पोनप्पा या दोघांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरोधात लैंगिक अत्याचार, पुरावे दडपण्याचा प्रयत्न आणि महिलेच्या हालचालींवर बंधने आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेनंतर कर्नाटकातील होमस्टे आणि पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर नियम आणि होमस्टेंची तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



