पारशिवनीत खळबळ! मंत्र्यांच्या निकटवर्तीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; विष प्राशन की घातपात?

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेंढरी गावाजवळ एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुण हा राज्य मंत्री अॅड. आशिष जयसवाल यांचा निकटवर्तीय असल्याने या घटनेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चा रंगल्या आहेत.
मृत तरुणाची ओळख गौरव पनवेलकर अशी झाली असून, ते तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य होते. प्राथमिक माहितीनुसार, गौरव पनवेलकर मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास “बीटोलीला जात आहे” असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
बुधवारी सकाळी सुमारे सहा वाजता पेंढरी गावाजवळ गौरव पनवेलकर यांची कार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे आढळून आले. स्थानिकांनी याची माहिती तात्काळ पारशिवनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता कारजवळ गौरव पनवेलकर यांचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक तपासात त्यांनी विष प्राशन केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हा प्रकार आत्महत्या आहे की त्यामागे घातपाताचा कोणता तरी कोन आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी या घटनेकडे संशयास्पद मृत्यू म्हणून पाहत सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. सायंकाळी चार वाजता राज्य मंत्री अॅड. आशिष जयसवाल आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात गौरव पनवेलकर यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, शेवटचे लोकेशन, तसेच त्यांच्यासोबत संपर्कात असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात असल्याचे समजते. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूमागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे पारशिवनी परिसरात शोककळा पसरली असून, आत्महत्या की घातपात, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. आता पोलिसांच्या तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



