नागपूरात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश… ७ दुचाकी जप्त, सराईत आरोपी अटकेत!

नागपूर शहरात गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 03 ने मोठी कारवाई करत वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 07 चोरीची दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून 06 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. तसेच एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नागपूर गुन्हे शाखेने विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लखपती बस्ताराम फेन्डर (वय 31) असून तो मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वाराशिवनी येथील रहिवासी आहे. आरोपी हा सराईत वाहनचोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या आरोपीकडून नागपूर आणि गोंदिया परिसरातून चोरीस गेलेल्या एकूण 07 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 2 लाख 80 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत तहसील, गणेशपेठ, जीआरपी नागपूर आणि गोंदिया येथील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी तहसील पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
“नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही आपल्या वाहनांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.”



