अमरावतीत भीमजयंतीचा जल्लोष… १३५ किलो केक कापत मध्यरात्रीच उत्सवाला सुरुवात

आज देशभरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अमरावती शहरातही या निमित्ताने जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
१४ एप्रिलच्या पूर्वसंध्येला रात्री बारा वाजताच इर्विन चौक परिसरात उत्सवाला सुरुवात झाली. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तब्बल १३५ किलोचा भव्य केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्याला बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि “जय भीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. राजेंद्र गवई उपस्थित होते. त्यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर १४ एप्रिल रोजी सकाळपासूनच इर्विन चौक येथे नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. निळ्या झेंड्यांनी आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांनी सजलेला परिसर अक्षरशः “निळ्या सागरात” परिवर्तित झाला होता. शहरभरातून आलेल्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला.
यावेळी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला.
“अमरावतीत साजरी झालेली ही भीमजयंती… उत्साह, एकता आणि प्रेरणेचा संगम ठरली.”



