अमरावती मनपामध्ये भीमजयंती उत्साहात… मान्यवरांकडून बाबासाहेबांना अभिवादन

अमरावती शहराच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये आजचा दिवस विशेष ठरला आहे. १४ एप्रिल निमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना, अमरावती महानगरपालिकेतही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अमरावती महानगरपालिकेच्या ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात’ जयंतीचा मुख्य सोहळा पार पडला. यावेळी माननीय महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन भेंडे, आयुक्त वर्षा लड्डा, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्यासह विविध पक्षांचे गटनेते, सभापती आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनपातील अभिवादनानंतर सर्व मान्यवरांनी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
या वेळी बाबासाहेबांच्या वेशभूषेत उपस्थित राहिलेल्या सर्जेराव गलपट यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही महामानवाला विनम्र अभिवादन केले.
“अमरावती महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आलेली ही भीमजयंती… उत्साह, शिस्त आणि समतेचा संदेश देणारी ठरली.”



