citynewsLatest NewsMaharashtraMaharashtraPoliticsNagpurpolitics

राहुल गांधींवर परिणामय फुके यांचा हल्लाबोल; नागपुरात ५ नोव्हेंबरला भाजपचा मोर्चा

नागपूर : भाजप नेते परिणय फुके यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत विदेशी फंडिंगच्या माध्यमातून देशातील संविधानाबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. नागपुरात ५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात भाजपचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

भाजपच्या प्रस्तावित मोर्चाबाबत बोलताना परिणामय फुके म्हणाले की, या आंदोलनात लोकशाही बचाव हा प्रमुख नारा दिला जाणार असून सर्व देशभक्त नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे.

महायुतीतील समन्वयावरही भाष्य

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी पराभव झाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून टीकाटिप्पणी होत असल्याचे फुके यांनी मान्य केले. मात्र, महायुतीमध्ये कोणताही गंभीर वाद नसून पुढील दोन ते तीन दिवसांत वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन सर्व प्रश्नांवर मार्ग काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीत नेमके कुठे कमी पडलो, याबाबत आत्मचिंतन केले जाईल. यामध्ये वादविवाद नसून आगामी काळात अधिक मजबूतपणे काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

रवींद्र धंगेकरांवर टीका

रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेवरही परिणामय फुके यांनी टीका केली. धंगेकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला असून विधानपरिषदेची संधी मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी काँग्रेसमध्ये असलेले धंगेकर आता महायुतीमध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी काँग्रेसच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही फुके यांनी केला.

राहुल गांधींवर जोरदार टीका

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना परिणामय फुके यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. राहुल गांधी हे देशासाठीच रेड फ्लॅग असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील संविधान आणि लोकशाही व्यवस्थेबाबत संभ्रम निर्माण करून कम्युनिस्ट विचारसरणी पुढे आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशातील गरिबी कमी झाल्याचा दावा

देशातील गरिबी कमी झाल्याच्या मुद्द्यावर बोलताना फुके यांनी नुकत्याच समोर आलेल्या अहवालाचा संदर्भ दिला. मागील काही वर्षांत देशातील गरिबीत मोठी घट झाल्याचा दावा त्यांनी केला. मागील बारा वर्षांत झालेला विकास आणि वाढलेली विदेशी गुंतवणूक यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळाल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांच्या टीकेला देशाच्या विकासाची आकडेवारीच उत्तर देत असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी नागपुरात होणाऱ्या भाजपच्या मोर्चाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनातून भाजप कोणती राजकीय भूमिका मांडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button