बुलडाण्यात भीषण अपघात; सैलानी बाबा दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला – २ ठार, २३ जखमी

बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला असून देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने झडप घातली. नांद्रा फाटा येथे पिकअप वाहन उलटल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर २३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर येथील बागवान कुटुंबीय सैलानी बाबा मंदिर येथे दर्शनासाठी जात होते. सर्वजण एका पिकअप वाहनातून प्रवास करत होते. मात्र मेहकर तालुक्यातील नांद्रा फाट्याजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्यावर उलटला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत अरमान शरीफ बागवान (१६ वर्षे) आणि रिहान सैदु बागवान (१७ वर्षे) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात जखमी झालेल्या २३ जणांवर मेहकर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या घटनेमुळे बागवान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघाताचा तपास बुलडाणा पोलीस करत आहेत.



