मुदतठेवींचे २ कोटी ११ लाख रुपये परत मिळेनात; दोन वित्तीय संस्थांविरोधात ग्राहकांची तक्रार

१६ ठेवीदारांचा आरोप; गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार करूनही कारवाई नसल्याचा दावा
नागपूर : मुदतठेवींची मुदत संपल्यानंतरही ठेवीची मूळ रक्कम परत मिळत नसल्याचा आरोप करत १६ ठेवीदारांनी पदविधर महिला अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर आणि संगीता अर्बन निधी लिमिटेड या दोन संस्थांविरोधात तक्रार केली आहे. या ठेवीदारांची एकूण रक्कम २ कोटी ११ लाख ८३ हजार रुपये असल्याचे तक्रारदारांनी निवेदनात नमूद केले आहे.
पत्रकार परिषदेसाठी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित ठेवीदारांनी या संस्थांमध्ये मुदतठेवी ठेवल्या होत्या. ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संबंधित संस्थांकडे रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र, वारंवार विनंती करूनही ठेवींची मूळ रक्कम परत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर ठेवीदारांनी इतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडेही रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र, तेथूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी ठेवीदारांनी नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात संबंधित संस्थांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार करूनही अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दिवाळीच्या काळात पैशांची गरज असताना मुदतठेवींची रक्कम मिळत नसल्याने ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे निवेदनात नमूद आहे. संबंधित प्रकरणाची दखल घेऊन ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांची मुदतठेव रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची माहिती प्रसिद्ध करून इतर नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक होऊ नये, असे आवाहनही तक्रारदारांनी केले आहे.



