citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या; चार चोरीची वाहने जप्त

गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ ची कारवाई; हुडकेश्वर, अजनी आणि तहसीलमधील चार वाहनचोरीचे गुन्हे उघड

नागपूर : शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत हुडकेश्वर, अजनी आणि तहसील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत ३ लाख २० हजार रुपये किमतीची चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.

३ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, केडीके कॉलेजच्या मैदानाजवळ दोन इसम संशयास्पदरीत्या फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन विश्वासात घेत चौकशी केली. त्यावेळी त्यांनी चार वाहने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशीदरम्यान केडीके मैदानाच्या आतील भागात ताडपत्रीने झाकून ठेवलेली चार वाहने आढळून आली. पोलिसांनी ती वाहने ताब्यात घेतली. आरोपींनी ही वाहने हुडकेश्वर, अजनी आणि तहसील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात समोर आले.

तीन पोलीस ठाण्यांतील चार गुन्हे उघड

या कारवाईत हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील दोन, अजनी पोलीस ठाण्यातील एक आणि तहसील पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण चार वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

  • हुडकेश्वर : गुन्हा क्रमांक १०२८/२०२६ आणि १०२९/२०२६
  • अजनी : गुन्हा क्रमांक ५४८/२०२६
  • तहसील : गुन्हा क्रमांक ४०८/२०२६

सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत नोंद असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद आहे.

३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमध्ये लाल रंगाची टीव्हीएस अपाचे (एमएच ४९ बीवाय ७६४०) किंमत एक लाख रुपये, हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच ३१ एफटी ५४२९) किंमत ७० हजार रुपये, हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच ३१ एझेड ८४२२) किंमत ५० हजार रुपये आणि अ‍ॅक्टिव्हा (एमएच ३२ एझेड ३०९३) किंमत एक लाख रुपये, अशा एकूण ३ लाख २० हजार रुपये किमतीच्या वाहनांचा समावेश आहे.

या प्रकरणात आशिष उर्फ प्रणित उर्फ रफ्तार शैलेश वाघमारे (वय २०, रा. कडबी चौक, लुंबिनी नगर, मेकोसाबाग, जरीपटका पोलीस ठाणे हद्द) याच्यासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी आरोपींना हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीवनी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ च्या पथकाने केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button