citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticspoliticsThane

“हे संविधान चोर आहेत”; काँग्रेसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती हल्ला

देशात अराजकता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप; चीनकडून निधी मिळाल्याचाही गंभीर दावा

प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणीचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवर संविधानाबाबत गंभीर आरोप केले. विरोधकांविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, “शिंदे यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासारखी फटकेबाजी केली.” त्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करत त्यांनी इंदिरा गांधी यांच्या काळातील घटनांचा संदर्भ दिला.

“काँग्रेस संविधान चोर” असल्याचा आरोप

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर संविधानाचा अवमान केल्याचा आरोप करताना म्हटले की, “हे संविधान चोर आहेत. त्यांच्याविरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल.”

१९७५ च्या आणीबाणीचा आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “इंदिरा गांधी यांचा नातूही तेच करत आहे. दारू तीच आहे, फक्त बॉटल बदलली आहे,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली.


चीनच्या पैशावर काँग्रेस अराजकता निर्माण करत आहे – फडणवीस

काँग्रेसला चीनकडून निधी मिळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

काँग्रेसवर आणखी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चीनकडून काँग्रेस पक्षाला मदतनिधी अथवा फंड मिळाल्याचा दावा केला. या निधीच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“चीनकडून काँग्रेस पक्षाला मदतनिधी देण्यात आला आहे. त्या चीनच्या पैशावर काँग्रेस देशात अराजकता निर्माण करत आहे,” असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला.

यावेळी त्यांनी विरोधकांच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही टीका केली. “सध्या एक लाल पुस्तक समोर येत आहे. संविधानालाही लाल रंगात आणले जात आहे. हे संसदेला शिव्या देतात, निवडणूक आयोगाला शिव्या देतात आणि आता सर्वोच्च न्यायालयावरही मोर्चा घेऊन गेले,” असे फडणवीस म्हणाले.


“बांगलादेशींची नावे मतदार यादीतून गेल्याने काँग्रेसला त्रास होतोय”

शेवटच्या बांगलादेशीचे नाव वगळेपर्यंत प्रक्रिया थांबणार नाही, मुख्यमंत्र्यांचा दावा

मतदार याद्यांमधून बांगलादेशी नागरिकांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. मतदार यादीतील अशा नावांवर कारवाई सुरू असल्याचा दावा करत त्यांनी ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे म्हटले.

“बांगलादेशींची नावे मतदान यादीतून बाहेर काढल्यामुळे काँग्रेसला मळमळत आहे. त्यांना आपलं पोटचं मूल गेल्याचं दुःख होत आहे,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

तसेच, “जोपर्यंत शेवटच्या बांगलादेशीचे नाव मतदार यादीतून काढले जात नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार नाही,” असा दावा फडणवीस यांनी केला.

‘विकसित भारत’ घडवण्याचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाला विकसित भारताच्या दिशेने नेण्याचा संकल्प सरकारने केला आहे.

“मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारत घडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, काँग्रेसकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button