BhandaracitynewsLatest NewsMaharashtra

परसोडीत बोळीची पाळ फोडल्याचा आरोप; न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

जमीन व पाण्याच्या हक्कावरून वाद; ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर लांडगे कुटुंबाचे गंभीर आरोप

भंडारा | प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील परसोडी गावातील पुनर्वसित पोवारटोली येथे जमीन आणि पाण्याच्या हक्कावरून वाद निर्माण झाला असून, लांडगे कुटुंबाने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या ताब्यातील बोळीची पाळ फोडून पाणी बाहेर सोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे.

लांडगे कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक १४७ मधील त्यांच्या ताब्यातील जमिनीच्या पट्ट्याचा विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे अद्याप प्रलंबित आहे. असे असतानाही ग्रामपंचायत परसोडीतील काही पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून बोळीची पाळ फोडली आणि त्यातील पाणी बाहेर सोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, संबंधित बोळी अनेक वर्षांपासून शेतीसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. बोळीतील पाणी बाहेर गेल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे शेतकरी कुटुंबात संतापाचे वातावरण आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लांडगे कुटुंबाने प्रशासनाकडे केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत प्रशासनाकडून पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती असून, संबंधित आरोपांबाबत ग्रामपंचायत किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

या प्रकरणातील तथ्य चौकशीनंतरच स्पष्ट होणार असले, तरी जमीन आणि शेतीच्या पाण्याशी संबंधित या वादामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. प्रशासनाच्या चौकशीकडे आणि पुढील निर्णयाकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button