AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत हेल्मेट जनजागृतीसाठी भव्य मोटारसायकल रॅली

‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ अभियानांतर्गत वाहतूक शाखेचा उपक्रम; शंभरहून अधिक दुचाकीस्वारांचा सहभाग

अमरावती | प्रतिनिधी

रस्ते अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने अमरावती शहर वाहतूक शाखेच्या वतीने मंगळवारी हेल्मेट जनजागृती मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमात शंभरहून अधिक दुचाकीस्वारांनी सहभाग नोंदवत नागरिकांना सुरक्षित वाहनचालकतेचा संदेश दिला.

सन २०३० पर्यंत रस्ते अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर ही जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. पोलीस आयुक्त राकेश ओला आणि पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

या रॅलीत शहरातील विविध रायडर्स ग्रुप, वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक सहभागी झाले. सुमारे १०० ते ११० दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करून शहरभर रस्ता सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती केली.

रॅलीचा मार्ग इर्विन चौक, राजकमल चौक, राजापेठ उड्डाणपूल, फरशी स्टॉप, यशोदा नगर, एसटी डेपो, पंचवटी चौक, शेगाव नाका आणि रामपुरी कॅम्प या प्रमुख मार्गांवरून निश्चित करण्यात आला होता. मार्गातील विविध चौकांमध्ये थांबून ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी “हेल्मेट वापरा, सुरक्षित राहा” आणि “सुरक्षित प्रवास, कुटुंबाचा विश्वास” असे संदेश असलेले फलक झळकविण्यात आले. जनजागृती वाहनाच्या माध्यमातूनही हेल्मेटचे फायदे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती वाढविण्यासाठी अशा मोहिमा प्रभावी ठरत असल्याचे मत सहभागी नागरिकांनी व्यक्त केले.

रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या गंभीर दुखापती आणि मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर हा अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. सुरक्षित वाहनचालकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे शहरभर स्वागत करण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button