citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात कुख्यात घरफोड्या आणि वाहनचोर पोलिसांच्या जाळ्यात

पियुष उर्फ गधा निमजेची ८ गुन्ह्यांची कबुली; ३ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपीवर आधीच २० गुन्हे

नागपूर | यशोधरा नगर

नागपुरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या कुख्यात आरोपीला अखेर यशोधरा नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पियुष उर्फ गधा दीपक निमजे याच्याकडून तब्बल आठ गुन्ह्यांची कबुली घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याच्याकडून चोरीची वाहने, दागिने आणि इतर साहित्य असा एकूण ३ लाख ४७ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, पियुष निमजे याच्यावर यापूर्वीच २० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर नागपुरातील आणखी काही घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

३ सप्टेंबर रोजी यशोधरा नगर पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून पियुष निमजेबाबत माहिती मिळाली. तो पाचपावली परिसरातील असून, घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर पंचवटी नगर मैदान परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पियुष निमजे पोलिसांना आढळून आला. सुरुवातीला घरफोडी आणि वाहन चोरीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र सखोल चौकशी केल्यानंतर त्याने विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने यशोधरा नगर हद्दीतील कुंदनलाल गुप्ता नगर, कांजी हाऊस आणि धम्मदीप नगर परिसरात घरफोड्या केल्या. तसेच धम्मदीप नगरमधून हिरो एक्स्ट्रीम, कुंदनलाल गुप्ता नगरमधून पांढऱ्या रंगाची पल्सर, हुडकेश्वरच्या नवीन नेहरू नगरमधून स्प्लेंडर, पारडी परिसरातून होंडा ॲक्टिव्हा 6G आणि शांतीनगरमधून रॉयल एनफिल्ड बुलेट चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरी केलेली वाहने आणि घरफोडीत मिळालेला मुद्देमाल इटाभट्टी चौकातील विटाभट्टीच्या मागे लपवून ठेवल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. त्यानंतर पंच आणि पोलीस पथकाच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी जाऊन हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ३ लाख ४७ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

दरम्यान, आरोपीच्या हालचालींवर पोलिसांकडून मागील तीन दिवसांपासून बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. त्याच्या जवळच्या मित्रांवरही पोलिसांनी पाळत ठेवली होती. अखेर तपास पथकाला पियुष निमजेला ताब्यात घेण्यात यश आले.

आता आरोपीकडून आणखी किती गुन्हे उघडकीस येतात आणि या चोरीच्या घटनांमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे पियुष निमजेच्या अटकेनंतर नागपुरातील घरफोडी आणि वाहन चोरीच्या आणखी घटनांचा छडा लागण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button