citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

पोहे-साखर घेण्याचा बहाणा अन् दुकानदाराची सोन्याची चैन लंपास

जरीपटका पोलिसांची मोठी कामगिरी; 350 CCTV तपासून आरोपीसह विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात, 2.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर | जरीपटका

नागपुरातील जरीपटका परिसरात ग्राहक बनून दुकानात आलेल्या चोरट्याने दुकानदाराच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोहे आणि साखर घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून आरोपीने संधी साधत चैन हिसकावली आणि साथीदाराच्या दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला.

मात्र, जरीपटका पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत तब्बल 350 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, तसेच तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. या कारवाईत एका आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नी कल्पना गुप्ता यांच्यासह जरीपटका परिसरातील आपल्या दुकानात बसले होते. त्यावेळी एक अनोळखी मुलगा ग्राहक बनून दुकानात आला. त्याने एक पाव पोहे आणि एक पाव साखर मागितली.

फिर्यादी साखर मोजत असतानाच आरोपीने अचानक त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावली आणि दुकानातून बाहेर पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने चोर-चोर असा आरडाओरडा करत आरोपीचा पाठलाग केला.

मात्र, दुकानाबाहेर आरोपीचा एक साथीदार आधीपासूनच दुचाकी सुरू करून उभा होता. चैन हिसकावणारा आरोपी थेट दुचाकीवर बसला आणि दोघेही रिंग रोडच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील आणि संभाव्य मार्गांवरील तब्बल 350 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यासोबतच तांत्रिक साधनांचा वापर आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.

तपासादरम्यान निकेत दीपक बागेश्वर याला आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून चोरीच्या सोन्याच्या चैनमधील अंदाजे एक तोळ्याचा तुकडा, गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिव्हा 4G दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणातील लालू उर्फ चुंगल बाबा किसनलाल राठोड हा पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याचा शोध सुरू आहे.

ग्राहक बनून दुकानात प्रवेश करत चोरीचा डाव आखणाऱ्या आरोपींचा 350 CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी माग काढला आहे. आता फरार आरोपीला कधी अटक होते आणि या टोळीने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button