कारंज्यातील वीज समस्यांवर आमदार भावनाताई गवळी आक्रमक

खंडित वीजपुरवठा, लो व्होल्टेज आणि जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करण्याचे महावितरणला निर्देश
कारंजा | वाशिम
कारंजा तालुक्यातील वीज समस्यांवर विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी आक्रमक झाल्या आहेत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, लो व्होल्टेज, जळालेले ट्रान्सफॉर्मर आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी अपुरा वीजपुरवठा या समस्यांची दखल घेत आमदार गवळी यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला.
कारंजा तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी गेल्या काही काळापासून विविध वीज समस्यांना सामोरे जात आहेत. ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. तर दुसरीकडे लो व्होल्टेज आणि जळालेले ट्रान्सफॉर्मर यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवरही मोठा परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख मंगेश पाटील मुंदे यांनी आमदार भावनाताई गवळी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कारंजा तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज समस्यांचे निवेदन आमदारांकडे सादर केले.
निवेदनाची तातडीने दखल घेत आमदार भावनाताई गवळी यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी दूरध्वनीवरून थेट संपर्क साधला. तालुक्यातील अनियमित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, जळालेले तसेच बिघडलेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलावे, लो व्होल्टेजच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
वीजपुरवठ्याच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना आमदारांनी थेट महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता दिलेले निर्देश प्रत्यक्षात कितपत अंमलात येतात आणि तालुक्यातील वीज समस्या किती लवकर सुटतात, याकडे नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विशेषतः सिंचनासाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्यात सुधारणा झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून प्रलंबित वीज समस्या मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



