मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेड-वसमत महामार्गावर मराठा समाजाचा रास्तारोको

तासाभरापासून वाहतूक ठप्प; रुग्णवाहिकेला आंदोलकांनी दिली वाट, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नांदेड : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून, आंदोलकांनी नांदेड-वसमत महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केलं आहे. मराठा आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखल्याने गेल्या तब्बल तासाभरापासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी महामार्गावर एकत्र येत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी केली.
रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, रास्तारोको आंदोलन सुरू असतानाच एक रुग्णवाहिका अडकल्याचे आंदोलकांच्या लक्षात आले. रुग्णवाहिकेतील रुग्णाची परिस्थिती लक्षात घेऊन मराठा आंदोलकांनी तातडीने बाजूला होत रुग्णवाहिकेला जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. त्यामुळे आंदोलकांच्या संवेदनशीलतेचेही दर्शन घडले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिला आहे.
दरम्यान, महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.



