दिवाळीत विशेष रेल्वे गाड्या सोडा! प्रवाशांच्या आर्थिक लुटीविरोधात भाजप आक्रमक

पुणे-मुंबईहून मराठवाड्यासाठी अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी; खासगी ट्रॅव्हल्सच्या वाढीव भाड्यांवर किशोर देशमुख यांचा आक्षेप
नांदेड | सिटी न्यूज
दिवाळीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी ट्रॅव्हल्सकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीने विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे. पुणे आणि मुंबईहून मराठवाड्यासाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजपचे नांदेड जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांनी केली आहे.
खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यांमुळे प्रवाशांना आर्थिक फटका
दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असताना खासगी ट्रॅव्हल्सचे भाडेही वाढत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. एका कुटुंबाला गावी येण्या-जाण्यासाठी तब्बल ८ ते १२ हजार रुपये खर्च करावे लागत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भार पडत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.
नंदीग्राम आणि देवगिरी एक्सप्रेसमध्ये प्रचंड गर्दी
नंदीग्राम आणि देवगिरी एक्सप्रेसच्या जनरल डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे भाजपने निदर्शनास आणून दिले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
परभणी, नांदेड, हिंगोली आणि उमरखेड मार्गावर विशेष गाड्यांची मागणी
पुणे आणि मुंबईहून मराठवाड्याकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी परभणी, नांदेड, हिंगोली आणि उमरखेड मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी किशोरजी देशमुख यांनी केली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळेल आणि खासगी वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, अशी भूमिका भाजपने मांडली आहे.
खासदार आणि रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
या मागणीसाठी रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर (DRM) भूमिका मांडण्यात आली. विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी खासदार आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांनी सांगितले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेऊन अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करते का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
बाईट : किशोरजी देशमुख, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, नांदेड
सिटी न्यूज | नांदेड



