नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! प्रतिबंधित नायलॉन मांजाचा कारखाना उद्ध्वस्त

दादरा आणि नगर हवेली येथे सुरू होती निर्मिती; ६ कोटी २६ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : प्रतिबंधित नायलॉन मांजाची निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्या कारखान्याविरुद्ध नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दादरा आणि नगर हवेली येथील औद्योगिक परिसरात सुरू असलेल्या या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी नायलॉन मांजा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, कच्चा माल आणि तयार मांजा असा एकूण ६ कोटी २६ लाख ४३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे पर्यावरणाला आणि नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा गोंडखैरी येथील लॉजिस्टिक यार्डमध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजाची वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात आला होता. या कारवाईत सुमारे १,२०० नग नायलॉन मांजाच्या प्लास्टिक चक्री आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर असा एकूण ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे नायलॉन मांजाचा मूळ स्रोत शोधण्यास सुरुवात केली. तपासात दादरा आणि नगर हवेली येथील औद्योगिक परिसरात नायलॉन मांजाची निर्मिती होत असल्याची माहिती समोर आली.
बंद कंपनीत सुरू होती निर्मिती
पोलिसांनी संबंधित ठिकाणी तपास केला असता, मार्मिक इंडस्ट्रीज या कंपनीत नायलॉन मांजाची निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली. कंपनी बंद असल्याने पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेतली. त्यानंतर २३ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी तपासणी आणि जप्तीची कारवाई केली.
या कारवाईत नायलॉन मांजा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध यंत्रसामग्रीसह प्लास्टिक चक्री, कच्चा माल, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या.
विविध ब्रँडच्या नावाने तयार होत होता मांजा
पोलिसांच्या माहितीनुसार, गोल्ड, शक्ती, कोब्रा, मोनोकाइट, गोल्ड काइट, हिरो प्लस, गोल्ड शक्ती आणि वेलिन मोनो यांसारख्या विविध नावांनी नायलॉन मांजा तयार केला जात होता. या मांजाचे उत्पादन, गुंडाळणी आणि पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे तसेच इतर साहित्यही जप्त करण्यात आले.
या कारवाईत तयार नायलॉन मांजा, मांजा तयार करण्याची यंत्रसामग्री, कच्चा माल आणि संबंधित साहित्य असा एकूण ६ कोटी २६ लाख ४३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या निर्मिती आणि पुरवठ्याच्या साखळीचा शोध घेण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सिटी न्यूज | नागपूर



