ChikhaldaracitynewsLatest NewsMaharashtra

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला चिखलदऱ्यात शिक्षकाचा बुडून मृत्यू

कलालकुंड परिसरातील ३० फूट खोल डोहात वाहून गेले ३६ वर्षीय विपिन कोरे; DDRF पथकाकडून मृतदेह बाहेर काढण्यात यश

चिखलदरा | अमरावती

शिक्षक दिनाच्या अवघ्या एक दिवस आधी चिखलदऱ्यातून धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. फिरण्यासाठी आलेल्या शिक्षकांच्या समूहातील ३६ वर्षीय शिक्षक नदीच्या पात्रात उतरले असताना अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. विपिन मनोहर कोरे असे या शिक्षकाचे नाव असून, तब्बल ३० फूट खोल डोहात शोधमोहीम राबवल्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या विजय कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले आणि ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्यरत शिक्षक विपिन मनोहर कोरे हे शिक्षकांच्या एका समूहासोबत चिखलदरा येथे फिरण्यासाठी आले होते. आळंदी कलालकुंड परिसरात फिरत असताना ते नदीच्या पात्रात उतरले.

याचवेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि विपिन कोरे जोरदार प्रवाहात वाहून गेले. घटनेनंतर त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र ते सापडले नाहीत. या दुर्घटनेची माहिती मिळताच ५ सप्टेंबर रोजी प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली.

पोलीस, वनविभाग आणि DDRFच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्याला सुरुवात केली. प्रशिक्षित गोताखोरांच्या मदतीने लाईफ बॉय रिंग, हुक तसेच इतर रेस्क्यू उपकरणांचा वापर करून नदीपात्रातील डोहात शोध घेण्यात आला.

तब्बल दुपारी दोन वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती. अखेर DDRFच्या पथकाला विपिन कोरे यांचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच अमरावतीत हळहळ व्यक्त होत आहे.

विपिन कोरे हे ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना नृत्याचे प्रशिक्षण देत होते. त्यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी मृत्यूने विद्यार्थी, सहकारी शिक्षक तसेच त्यांच्या परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, कलालकुंड धबधब्याच्या परिसरात सुमारे ३० फूट खोल डोह असल्याची माहिती आहे. पावसाळ्यात डोंगररांगांमधून येणारे पाणी मोठ्या वेगाने या भागातून वाहते. त्यामुळे हा परिसर अत्यंत धोकादायक मानला जातो.

विशेष म्हणजे, कलालकुंड परिसर अभयारण्य क्षेत्रात येत असून पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवेशावर निर्बंध असलेल्या या दुर्गम आणि धोकादायक परिसरात शिक्षकांचा समूह नेमका कसा पोहोचला, याचा तपास आता चिखलदरा पोलीस करत आहेत.

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षिततेसोबतच प्रतिबंधित क्षेत्रात होणाऱ्या प्रवेशाचा प्रश्नही ऐरणीवर आणला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button