नागपुरात १४५ वर्षांची मारबत परंपरा पुन्हा सज्ज; महोत्सवाला सुरुवात

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काळी-पिवळी मारबतची विधिवत पूजा; ११ सप्टेंबरला भव्य मारबत महोत्सव
नागपूर : नागपूरची १४५ वर्षांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळी आणि पिवळी मारबतची विधिवत पूजा करण्यात आली. यंदाचा मुख्य मारबत महोत्सव ११ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
मारबत महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या आयोजनात यंदा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
१४५ वर्षांची परंपरा जपण्याचा संकल्प
यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागपूरच्या मारबत उत्सवाला मोठी ऐतिहासिक परंपरा असल्याचे सांगितले. इडा, पीडा, अनिष्ट प्रथा, रोगराई आणि समाजातील वाईट प्रवृत्ती घेऊन जा, अशी श्रद्धा या परंपरेमागे आहे.

जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या मारबतसारख्या पारंपरिक उत्सवांचे जतन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचा राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.
वाईट प्रवृत्ती दूर करण्याचे प्रतीक
महापौर निता ठाकरे यांनी मारबत आणि बडग्या हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजातील अनिष्ट आणि वाईट गोष्टी तसेच संकटे दूर करण्याचे प्रतीक असल्याचे सांगितले. पोलीस विभाग आणि महानगरपालिका उत्तम समन्वयाने काम करत असून, यंदाचा महोत्सव नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाजातील वाईट प्रवृत्तींचा बिमोड करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे आवाहनही महापौरांनी केले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महोत्सव नेण्याचे प्रयत्न
दरवर्षीप्रमाणे यंदाही पिवळी मारबत तऱ्हाने तेली समाजाच्या वतीने, तर काळी मारबत काली मारबत उत्सव समितीच्या वतीने आयोजित केली जात आहे.
महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र बाल्या बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन तसेच क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांच्या देखरेखीखाली महोत्सवाची तयारी सुरू आहे.
मारबत महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती तसेच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांना विशेष निमंत्रण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्यासह खासदार आणि आमदारांनाही आमंत्रित करण्यात येत आहे.
हेरिटेज वॉकमधून मारबतचा इतिहास नागरिकांसमोर
मारबत महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले.
काळी मारबत मंदिरापासून या हेरिटेज वॉकला सुरुवात झाली. सहभागी नागरिकांना काळी मारबतचे दर्शन घडवून तिचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा समजावून सांगण्यात आला. त्यानंतर पिवळी मारबतच्या दिशेने जाताना आर्किटेक्ट मंदिरा नेवारे यांनी मार्गातील ऐतिहासिक संदर्भ आणि मारबत परंपरेचा इतिहास सहभागी नागरिकांना सांगितला.
पिवळी मारबत येथे पोहोचल्यानंतर तिचा इतिहास, परंपरा तसेच मारबतला ओटी भरणे आणि पूजा करण्यामागील श्रद्धा व महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या हेरिटेज वॉकच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या मंदिरा नेवारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बाडग्यावर विशेष अभ्यास करून पीएचडी पदवी मिळवणाऱ्या राहुल जांभूळकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मारबत मार्गाची संयुक्त पाहणी
११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य मारबत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेहरूपुतळा चौक ते पिवळी मारबत चौक या मार्गाची पोलीस आणि मनपा प्रशासनाने संयुक्त पाहणी केली.

महापौर निता ठाकरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी करण्यात आली. महोत्सवादरम्यान वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
मारबत पाहण्यासाठी कोणतेही तिकीट नाही
दरम्यान, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी स्पष्ट केले की, नागपूर महानगरपालिकेकडून मारबत पाहण्यासाठी कोणतेही तिकीट आकारले जात नाही.
मारबतच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी नागरिकांना जोडण्यासाठी मनपाकडून जनजागृती आणि प्रचार-प्रसार केला जात आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मारबत महोत्सवाचे छायाचित्र किंवा नाव असलेले टी-शर्ट आणि बँड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र त्यांची खरेदी पूर्णपणे ऐच्छिक असून, टी-शर्ट किंवा बँड खरेदीचा मारबत पाहण्याच्या प्रवेशाशी कोणताही संबंध नाही.
सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करून नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत माध्यमांवरील माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या मारबत महोत्सवाचा मुख्य सोहळा ११ सप्टेंबरला होणार असून, यंदा तो अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.



