अमरावतीत जल्लोषाऐवजी साधेपणाने दहीहंडी; युवा स्वाभिमानचा सामाजिक बांधिलकीचा संदेश

DJ, फटाके आणि गाजावाजा टाळला; ५० लाखांचा सामाजिक निधी, बालमृत्यूतील कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखांची मदत
अमरावती : अमरावतीमध्ये दरवर्षी दहीहंडी म्हटलं की डीजेचा गजर, ढोल-ताशांचा नाद आणि गगनभेदी जल्लोष पाहायला मिळतो. मात्र यंदा जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्दैवी बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्षाची दहीहंडी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कोणताही डीजे, फटाके किंवा मोठा गाजावाजा न करता बालगोपालांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.
दरवर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी सोहळा आयोजित केला जातो. मात्र यंदा अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी बालमृत्यूच्या घटनेमुळे उत्सवाचा जल्लोष टाळून सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश देण्याचा निर्णय युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने घेण्यात आला.
दहीहंडी सोहळ्यात डीजे, फटाके आणि मोठा गाजावाजा पूर्णपणे टाळण्यात आला. त्याऐवजी बालगोपालांच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे यंदाचा दहीहंडी सोहळा पारंपरिक जल्लोषापेक्षा सामाजिक संवेदनशीलतेसाठी चर्चेत आला.

या कार्यक्रमादरम्यान विविध सामाजिक उपयोगी उपक्रमांसाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
याशिवाय रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही प्रत्येकी ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्यामुळे यंदाची दहीहंडी केवळ उत्सव न राहता दुःखाच्या काळात पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम ठरला.
रवी राणांचा उद्धव ठाकरे, सुषमा अंधारेंवर निशाणा
दरम्यान, याच कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालमृत्यूच्या संवेदनशील घटनेवर केवळ राजकारण केले जात असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला पीडित कुटुंबीयांबद्दल खरोखरच कणव असती, तर सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून त्या कुटुंबांना आर्थिक मदत केली असती, असा दावा त्यांनी केला.
यासोबतच सुषमा अंधारे यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांचा संदर्भ देत रवी राणा यांनी त्यांच्यावर नास्तिक असल्याचा आरोप केला. अंबानगरी ही अंबादेवी आणि एकवीरा मातेची पवित्र भूमी असल्याचे सांगत हनुमान गढी तीर्थक्षेत्र आणि त्याच्या विकासावर करण्यात आलेल्या टीकेवरही त्यांनी आक्षेप घेतला.
हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून आपल्याला १४ दिवस तुरुंगात जावे लागले होते, अशी आठवण करून देत रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
एकीकडे बालमृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने दहीहंडी साजरी करत सामाजिक मदतीचा हात देण्यात आला, तर दुसरीकडे याच व्यासपीठावरून झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे अमरावतीतील दहीहंडी सोहळा चर्चेचा विषय ठरला.



