कामरगावच्या मुख्य रस्त्यावर अडीच महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य

पथदिवे बंद असल्याने अपघातांचा धोका वाढला; चोऱ्यांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कामरगाव | प्रतिनिधी सागर घोडे, सिटी न्यूज
अमरावती ते कारंजा लाड या महत्त्वाच्या महामार्गावर असलेल्या कामरगावच्या मुख्य रस्त्यावर गेल्या अडीच महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य रस्ता तसेच बस स्थानक परिसरातील पथदिवे दीड-दोन नव्हे तर तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून, परिसरात चोऱ्यांच्या घटना वाढल्याने व्यापारी आणि दुकानदारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामरगाव हे परिसरातील सुमारे २० ते २५ गावांसाठी प्रमुख संपर्क केंद्र मानले जाते. त्यामुळे दिवसभर या मार्गावर नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, वाहनचालक आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र सायंकाळनंतर मुख्य रस्ता आणि बस स्थानक परिसर अंधारात बुडत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी बसची वाट पाहणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडण्याची शक्यता वाढली असून, प्रत्यक्षात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचा दावा स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या परिस्थितीमुळे दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दुकान बंद करून रात्री घरी परतताना अंधारामुळे नागरिकांना भीती वाटत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असताना पथदिवे बंद असल्याने समोरून येणारे वाहन, पादचारी किंवा रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
पथदिवे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत तसेच संबंधित रस्ता कंत्राटदारांकडे नागरिकांनी विचारणा केली असता, ही जबाबदारी आमची नाही, असे सांगण्यात येत असल्याचा आरोप कामरगावकरांनी केला आहे. त्यामुळे पथदिव्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पथदिवे बंद असतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मुख्य रस्ता आणि बस स्थानक परिसरातील सर्व पथदिवे सुरू करावेत, अशी जोरदार मागणी कामरगावकरांनी केली आहे.
आता या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण, प्रशासन यावर कधी कारवाई करणार आणि कामरगावकरांना अंधारातून कधी मुक्ती मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून पथदिव्यांची दुरुस्ती आणि नियमित देखभालीची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी सागर घोडे, सिटी न्यूज



