नागपुरात घरफोडीच्या २ गुन्ह्यांचा पर्दाफाश

युनिट ३ गुन्हे शाखेची कारवाई; चौघे ताब्यात, दुचाकीसह २८ हजारांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : नागपूर शहरात घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ३ पथकाने घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत तीन आरोपींसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत पियुष उर्फ डीजे निलेश सोनटक्के, वय १८ वर्षे, रा. विनोबा भावे नगर, यशोधरानगर; मोहम्मद जीशान अन्सारी, वय १८ वर्षे, रा. कुंदनलाल गुप्ता नगर, यशोधरानगर; एक विधी संघर्षग्रस्त बालक आणि वृत्तांत दीपक द्रविडकर, वय २१ वर्षे, रा. विनोबा भावे नगर, यशोधरानगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
युनिट ३ पथकाच्या तपासात सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा क्रमांक ४२७/२०२६ तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २३३/२०२६ असे घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली CD Deluxe दुचाकी क्रमांक MH 31 CZ 7159, अंदाजे २५ हजार रुपये किमतीची, तसेच ३ हजार रुपये रोख असा एकूण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासादरम्यान आरोपींना ताब्यात घेऊन नागपूर शहर पोलीस हद्दीतील वेगवेगळ्या घटनास्थळांवरील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. त्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी क्रमांक १ ते ३ यांना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात, तर आरोपी क्रमांक ४ याला कोतवाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
युनिट ३ गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे नागपूर शहरातील घरफोडीच्या आणखी काही घटनांचा तपास लागण्याची शक्यता असून, आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.



