अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ५५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

नागपूरहून अमरावतीकडे येणाऱ्या ट्रकवर छापा; दोन आरोपी अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलिसांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूरहून अमरावतीकडे येणाऱ्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूमिश्रित पानमसाला आणि गुटखा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तिवसा परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सुनीत हॉटेलजवळ नाकाबंदी करून MH-01-CV-6282 क्रमांकाच्या अशोक लेलँड ट्रकची तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूमिश्रित पानमसाला आणि गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३९ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा तसेच १६ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अब्दुल रफीक अब्दुल शब्बीर आणि अर्शीद खान रहमत खान या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध तिवसा पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून या अवैध गुटखा रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि इतर संबंधितांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता टोळेवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, अवैध गुटखा पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.



