Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraMumbai

मालाडमध्ये भरधाव कारचा कहर! स्कुटीसह ३ रिक्षांना धडक; महिला वकिलाचा मृत्यू

भीषण अपघातात ६ जण गंभीर जखमी; आरोपीला कथित VIP ट्रीटमेंट दिल्याच्या आरोपाने प्रकरण तापलं

मुंबई : मालाड पश्चिमेकडील एस.व्ही. रोड आणि मामलेदार वाडी जंक्शनवर रविवारी रात्रीच्या सुमारास भरधाव कारने सिग्नलवर थांबलेल्या स्कुटीसह तीन ऑटो रिक्षांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ३४ वर्षीय महिला वकील प्रियंका यांचा मृत्यू, तर त्यांच्या पतीसह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्रियंका आणि त्यांचे पती मयंक भाजी खरेदी करून घरी परतत होते. सिग्नलवर स्कुटी थांबवली असताना मागून आलेल्या कारने अचानक स्कुटीला आणि त्यानंतर तीन रिक्षांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की प्रियंका आणि मयंक हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

गंभीर जखमी झालेल्या प्रियंका यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तर मयंक यांच्या हात-पायांसह पाठीला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. या अपघातात तीन रिक्षाचालकांसह इतर काही जणही गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी ७० वर्षीय बिल्डर कृष्णा चमनकर यांना अटक केली आहे. पोलिसांसमोर दिलेल्या कथित माहितीनुसार, ब्रेकऐवजी चुकून एक्सिलेटरवर पाय पडल्याने कार अनियंत्रित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या अपघातानंतर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. आरोपीला पोलीस ठाण्यात कथित VIP वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीला मोबाईल वापरण्याची परवानगी, बसण्यासाठी खुर्ची आणि त्यानंतर एसी खोलीत ठेवण्यात आल्याचा आरोप नगरसेवक प्रवीण शेडा यांनी केला आहे.

या आरोपांनंतर स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाब विचारत संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, मृत प्रियंका या नगरसेवक प्रवीण शेडा यांच्या चुलत बहिण असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे या प्रकरणात एका बाजूला भरधाव कारच्या धडकेत झालेला महिलेचा मृत्यू आणि सहा जणांची गंभीर दुखापत, तर दुसऱ्या बाजूला आरोपीला कथित VIP वागणूक दिल्याच्या आरोपामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

आता या अपघातासाठी नेमकी कोणाची चूक होती, आरोपीवर कोणती कायदेशीर कारवाई होणार आणि VIP वागणुकीच्या आरोपांबाबत पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण काय आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button