
नांगराच्या फाळात सापडली होती देवीची मूर्ती; नवसाला पावणाऱ्या जगदंबेच्या दर्शनासाठी विदर्भ-मराठवाड्यातील भाविकांची गर्दी
काही श्रद्धास्थळे ही केवळ मंदिरे नसतात, तर ती पिढ्यान्पिढ्या जपलेल्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि परंपरेचा अमूल्य वारसा असतात. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेले नागरतास येथील श्री जगदंबा देवी मंदिर संस्थान हे त्यापैकीच एक श्रद्धास्थान आहे. सुमारे चारशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून, नवसाला पावणाऱ्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर, नागपूर-मुंबई महामार्गालगत नागरतास हे गाव वसले आहे. या गावातील श्री जगदंबा देवी मंदिराला सुमारे चारशे वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. या मंदिराची स्थापना आणि देवीच्या मूर्तीच्या प्रकट होण्यामागील आख्यायिका भाविकांच्या श्रद्धेचा महत्त्वाचा भाग आहे.

स्थानिक आख्यायिकेनुसार, दसरूजी धुमसे नामक शेतकरी शेतात नांगरणी करत असताना त्यांच्या नांगराच्या फाळाला श्री जगदंबा देवीची मूर्ती लागली. त्यानंतर गावाच्या उत्तरेकडील शेतात मंदिर उभारून या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. या घटनेनंतर गावाला नागरतास हे नाव प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. तसेच मंदिर उभारणीशी संबंधित धुमसे कुटुंबाचे आडनाव पुढे देवळे म्हणून प्रचलित झाल्याचीही स्थानिक परंपरा आहे.
काळाच्या ओघात हे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले. नवसाला पावणारी आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी, अशी श्री जगदंबा मातेची ख्याती आहे. त्यामुळे दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. देवीच्या दर्शनासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून भाविक येतात. अनेक भाविक श्रद्धेने नवस बोलतात, तर मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही मंदिरात हजेरी लावतात.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर संस्थानच्या वतीने सलग नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देवी भागवत, भजन, कीर्तन आणि इतर धार्मिक उपक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.



