समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ! ४८ तासांत ७ जण अटकेत; ५ आरोपी फरार

खिळे टाकून वाहनं पंचर, शस्त्रांच्या धाकावर लूट; आता २४ तास पोलिसांची गस्त अन् हायटेक कॅमेऱ्यांचं सुरक्षा कवच
नाशिक : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी घातलेल्या धुमाकुळाने राज्यात खळबळ उडाली होती. नाशिकच्या सिन्नरजवळ रस्त्यावर खिळे आणि लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर पंचर करायचे आणि वाहन थांबताच प्रवाशांना शस्त्रांच्या धाकावर लुटायचे, अशी दरोडेखोरांची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे.
२७ ते २८ ऑगस्टच्या रात्री सिन्नरजवळील निर्मनुष्य आणि मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागात दरोडेखोरांनी वाहनांना लक्ष्य केलं. टायर पंचर झाल्यानंतर वाहन थांबताच कठड्यांच्या मागे दबा धरून बसलेले आरोपी लोखंडी रॉड, दांडके आणि धारदार शस्त्रांसह बाहेर येत प्रवाशांना लुटत असल्याची माहिती तपासात समोर आली.
छत्रपती संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारलाही अशाच पद्धतीने लक्ष्य करण्यात आलं. महिला आणि मुलांना मारहाण करत रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल १८ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची माहिती आहे.
तर हिंगोलीहून एका रुग्णाला घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनालाही दरोडेखोरांनी लक्ष्य केलं. या वाहनातून एक लाख रुपये लुटल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेडचे व्यावसायिक मोहम्मद फराण यांच्या वाहनावरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दरोडेखोरांचा प्रकार लक्षात येताच त्यांनी हवेत गोळीबार केल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे.
घटनांची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत सात आरोपींना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १२ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी पाच आरोपी अद्याप फरार आहेत.
अटक आरोपींकडून लुटलेला ऐवज, गुन्ह्यात वापरण्यात आलेली शस्त्रं आणि कार जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. अटक आरोपींवर यापूर्वीही दरोडा, जबरी चोरी आणि चोरीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनांनंतर आता समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी मोठा प्लॅन आखला आहे. महामार्गावर २४ तास दरोडा प्रतिबंधक पोलिसांची विशेष गस्त सुरू करण्यात आली आहे.
प्रत्येक १० ते १५ किलोमीटर अंतरावर क्विक रिस्पॉन्स व्हेईकल आणि महामार्ग पोलिसांची पथकं तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. संशयित आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त CCTV कॅमेरे, तर रात्रीच्या वेळी स्पष्ट दृश्य टिपणारे हायटेक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
तसंच, एखादं वाहन बंद पडलं किंवा अपघात झाला तर डायल ११२ वर संपर्क केल्यानंतर काही मिनिटांत मदत पोहोचेल, अशी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची तयारी सुरू आहे.
मुंबई ते नागपूर या संपूर्ण समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांचं सुरक्षा कवच अधिक मजबूत केलं जाणार आहे. मात्र पाच फरार आरोपी कधी पकडले जाणार आणि महामार्गावरील दरोड्यांना कायमचा आळा कधी बसणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.



