नागपुरात विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल? लंडन स्ट्रीटनंतर संवर्धन परिसरातही नागरिक आक्रमक

झाडतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींचं आंदोलन; संवर्धन परिसरात ६७ झाडे तोडल्याचा दावा, प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल
नागपूर : रस्ते रुंद व्हावेत, शहराचा विकास व्हावा… पण या विकासाची किंमत नागपूरच्या हिरवाईला मोजावी लागणार का? असा सवाल आता पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विकासकामांच्या नावाखाली झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करत नागरिक आक्रमक झाले आहेत.
नागपूरच्या लंडन स्ट्रीट परिसरात झाडतोडीला विरोध करत पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलं. झाडे तोडली जात असल्याची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.
याच मुद्द्यावरून आता संवर्धन परिसरातील झाडतोडीचाही विषय समोर आला आहे. या परिसरात सुमारे ६७ झाडे तोडल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी आणि जुनी झाडे तोडण्यासाठी परवानगी नेमक्या कोणत्या आधारावर देण्यात आली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
विकासकामांसाठी झाडे तोडणे अपरिहार्य असेल, तर तोडलेल्या झाडांच्या बदल्यात किती वृक्षारोपण करण्यात येणार? त्यांची देखभाल कोण करणार? आणि पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाणार, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढेही हा प्रश्न उपस्थित केला आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धनाची भूमिका मांडली जाते, तर दुसरीकडे शहरातील झाडांची कत्तल का, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
तोडण्यात आलेल्या झाडांची भरपाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवीन वृक्षारोपण करण्यात यावं आणि केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात त्या झाडांची देखभाल केली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विकासकामांना विरोध नाही; मात्र विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखला जावा, अशीच नागरिकांची भूमिका आहे. त्यामुळे लंडन स्ट्रीट आणि संवर्धन परिसरातील झाडतोडीबाबत प्रशासन काय स्पष्टीकरण देणार, याकडे आता नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे.



