खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्येच फेरफार! नवी मुंबईत FDA-पोलिसांची मोठी कारवाई
एसीटोन-थिनरने जुन्या तारखा पुसून नव्या तारखा छापल्याचा धक्कादायक प्रकार; २ कोटी ४६ लाखांहून अधिक रुपयांचा माल तपासणीखाली
नवी मुंबई : खाद्यपदार्थ खरेदी करताना पॅकेटवरील मॅन्युफॅक्चरिंग डेट, बेस्ट बिफोर आणि एक्सपायरी डेट तपासणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील तारखा आणि इतर माहितीमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून त्यांची विक्री आणि निर्यात केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तुर्भे येथील TTC औद्योगिक क्षेत्रातील एका गोदामावर गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDAने संयुक्त छापा टाकला. तपासादरम्यान खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील जुन्या तारखा बदलण्यासाठी एसीटोन आणि थिनरसारख्या केमिकलचा वापर होत असल्याचं आढळल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर डेट प्रिंटिंग मशीनच्या माध्यमातून नव्या तारखा छापल्या जात असल्याचाही संशय तपासात समोर आला.
साधना इंटरप्राइजेस या स्टेट लायसन्सधारक आस्थापनात विविध कंपन्यांचे खाद्यपदार्थ साठवले जात होते. तपासादरम्यान काही उत्पादनांच्या पॅकेटवरील मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, बेस्ट बिफोर डेट, बॅच नंबर आणि MRPमध्ये फेरफार केल्याचं समोर आलं.
या कारवाईदरम्यान जवळपास ११४ खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात आले. यामध्ये चिप्स, कुरकुरे, मॅगी, विविध फ्लेवर्सची पॅकेट्स, रेडी मिक्स आणि मसाल्यांच्या उत्पादनांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, काही पॅकेटवरील मूळ तारखा बदलून ऑक्टोबर महिन्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट छापल्याचं तपासात आढळल्याची माहिती आहे.
२४ ते ३० ऑगस्टदरम्यान झालेल्या तपासणीत एकूण १८ निर्यातदारांचा तब्बल २ कोटी ४६ लाख ५३ हजार ३५४ रुपयांचा माल तपासण्यात आला. त्यापैकी ११ निर्यातदारांच्या सुमारे ७५ लाख २१ हजार २६९ रुपयांच्या मालावरील लेबल आणि पॅकेटवरील उत्पादन तारीख, एक्सपायरी डेट, बेस्ट बिफोर तारीख, बॅच नंबर आणि MRPमध्ये बदल केल्याचं तपासात समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे.
या प्रकरणात जयप्रकाश संचतीराम सिंग आणि जया नवरंग बहादूर सिंग यांच्यासह संबंधित ११ निर्यातदार कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थाच्या पॅकेटवरील एक्सपायरी डेट ही थेट ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाब आहे. त्यामुळे तारखांमध्ये फेरफार करून उत्पादनांची विक्री किंवा निर्यात होत असल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे.
आता या संपूर्ण प्रकरणात नेमका किती माल बाजारात किंवा निर्यातीसाठी गेला, संबंधित उत्पादनांचा ग्राहकांच्या आरोग्यावर काही परिणाम झाला आहे का आणि दोषींवर प्रशासनाकडून कोणती कठोर कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



