AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

अमरावतीत दहीहंडीचा जल्लोष रद्द; ५० लाखांचा निधी सामाजिक उपक्रमांसाठी!

रवी राणांची मोठी घोषणा; साध्या पद्धतीने बालगोपालांच्या हस्ते दहीहंडी, आरोग्य शिबिरांसह समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन

अमरावती : यंदाच्या दहीहंडी उत्सवाला जल्लोषाऐवजी माणुसकीची किनार मिळणार आहे. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी नवाथे चौकात आयोजित करण्यात आलेली भव्य विदर्भस्तरीय दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे, दहीहंडी उत्सवासाठी राखून ठेवण्यात आलेला तब्बल ५० लाख रुपयांचा निधी विविध सामाजिक उपक्रमांसाठी समर्पित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मात्र, उत्सवाची संस्कृती आणि परंपरा कायम ठेवण्यासाठी नवाथे चौकात रविवारी सकाळी १० वाजता बालगोपालांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाचं पूजन करून अत्यंत साध्या पद्धतीने दहीहंडी फोडण्यात येणार आहे.

बालगोपालांचा आनंद कायम राहावा आणि त्यांची संस्कृतीशी नाळ जोडलेली राहावी, यासाठी राधा-कृष्ण सजावट स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून नवाथे चौकात विविध आरोग्य आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.

यामध्ये रक्तदान शिबिर, बालरोग तज्ज्ञांकडून बालकांची तपासणी, नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप, तसेच सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

यासोबतच पीडित कुटुंबांना मदत, विद्यार्थ्यांना आधार आणि गरजू नागरिकांना रोजगाराची साधनं उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक निधीचा वापर करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

म्हणजेच यंदा दहीहंडीचा मोठा जल्लोष न करता आरोग्य, मदत आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून माणुसकीचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

परंपरा कायम ठेवत उत्सवाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड देण्याचा हा निर्णय अमरावतीत चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी जल्लोषापेक्षा माणुसकीच्या उपक्रमांसाठी लक्षात राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button