राहुल गांधींविरोधातील FIR वरून अमरावतीत काँग्रेस आक्रमक! जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

FIR मागे घेण्याची काँग्रेसची मागणी; भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी, हल्दवानीतील कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशीची मागणी
अमरावती : राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या FIRच्या निषेधार्थ अमरावती शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
भाजपा सरकारचा निषेध असो… राहुल गांधी यांच्या विरोधातील FIR मागे घ्या, अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला आक्रमक पवित्रा व्यक्त केला.
या निषेध मोर्चात काँग्रेसचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर तथा मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, किशोर बोरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.
दरम्यान, उत्तराखंडमधील हल्दवानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभास्थळी कथित शुद्धीकरण विधी केल्याच्या प्रकारावरून काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील संबंधित भाजपा आणि आरएसएस कार्यकर्त्यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर FIR दाखल करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
तसंच, राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या FIRचा निष्पक्ष पुनर्विचार करून ती मागे घ्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली.
काँग्रेस नेत्यांनी यावेळी संविधान, सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला.
राहुल गांधी यांच्याविरोधातील FIR आणि हल्दवानीतील कथित प्रकारावरून आता काँग्रेसने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागण्यांवर प्रशासन आणि सरकारकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, तसेच FIRबाबत पुढील कायदेशीर निर्णय काय होतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.



