agriculturecitynewsLatest NewsMaharashtraYavatmal

खरीप पेरणीची तयारी सुरू; भुईमूग विक्रीसाठी यवतमाळ बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी, मात्र भावावर नाराजी

यवतमाळ | प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकरी पेरणीपूर्व तयारीला लागले आहेत. बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी घरात साठवून ठेवलेला भुईमूग विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत आहेत. त्यामुळे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शेतकरी आर्थिक नियोजनात व्यस्त आहेत. वर्षभराच्या गरजा आणि शेतीसाठी आवश्यक असणारा खर्च भागविण्यासाठी अनेक शेतकरी उन्हाळी भुईमूग विक्रीसाठी बाजार समितीकडे धाव घेत आहेत. गत काही हंगामांतील नापिकी, वाढलेला उत्पादन खर्च आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडले आहेत.

येत्या पेरणीसाठी बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी निधी उभारणे आवश्यक झाले आहे. पेरणीयोग्य पाऊस सुरू झाल्यानंतर धावपळ होऊ नये, यासाठी शेतकरी आतापासूनच आपल्या शेतमालाची विक्री करत आहेत.

मात्र, बाजारात भुईमुगाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आर्थिक गरज ओळखून व्यापारी कमी दर देत असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. तरीदेखील खरीप हंगामाची तयारी वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने बाजार समितीत दाखल होत आहेत.

खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी भुईमूग विक्रीतून आर्थिक जुळवाजुळव करत असले तरी योग्य बाजारभावाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि बाजार समिती कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button