सिटी न्यूजच्या बातमीचा दणका! आठ दिवसांपासून बंद असलेले पथदिवे अखेर सुरू; बडनेरा परिसर पुन्हा उजळला

अमरावतीच्या बडनेरा परिसरात माध्यमांच्या प्रभावाचे एक सकारात्मक उदाहरण पाहायला मिळाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत होते. मात्र सिटी न्यूजने हा गंभीर प्रश्न ठळकपणे मांडताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि अखेर बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करण्यात आले.
बडनेरा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते शहरी बेघर निवारा केंद्र या महत्त्वाच्या मार्गावर गेल्या आठ दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असतानाही पथदिवे बंद असल्याने वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला होता. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच कामावरून उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. परिसरातील नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, मात्र प्रशासन आणि वीज वितरण यंत्रणेकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर सिटी न्यूजने या समस्येवर सविस्तर वृत्त प्रसारित करत प्रशासनाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधले. बातमी प्रसारित झाल्यानंतर संबंधित यंत्रणांची धावपळ सुरू झाली आणि परिस्थितीची तातडीने दखल घेण्यात आली.
अखेर सोमवारी बंद पडलेले सर्व पथदिवे दुरुस्त करण्यात आले. तब्बल आठ दिवसांनंतर हा मुख्य मार्ग पुन्हा प्रकाशमान झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक नागरिकांनी सिटी न्यूजचे आभार मानत त्यांच्या समस्येला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.
मात्र या घटनेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित मूलभूत समस्या सोडवण्यासाठी माध्यमांनीच वारंवार पुढाकार घ्यावा लागणार का? संबंधित विभागांनी नियमित देखरेख ठेवून अशा समस्या वेळेत सोडवणे ही त्यांची जबाबदारी नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या मार्गावरील प्रकाश व्यवस्था पूर्ववत झाली असली तरी भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत राहणार असून जनहिताच्या मुद्द्यांवर आवाज उठवत राहणार आहे.



