citynewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurCrimeNagpurPolice

‘मांगूर माफिया’वर प्रशासनाचा सर्वात मोठा प्रहार; ११ तलावांवर धाड, हजारो प्रतिबंधित मासे जप्त!

रामटेक | प्रतिनिधी

रामटेक तालुक्यात प्रशासनाने अवैध मांगूर मासेपालनाविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत ‘मांगूर माफिया’चे जाळे उद्ध्वस्त केले आहे. मत्स्यव्यवसाय विभाग, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त धडक मोहिमेत तब्बल ११ तलावांमधून हजारो प्रतिबंधित मांगूर मासे जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून प्रशासनाचा धाक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक तालुक्यातील घुकसी गावाजवळील कृषी क्षेत्रात बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेल्या तलावांमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे पालन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी पडताळणी केल्यानंतर तत्काळ मत्स्यव्यवसाय विभाग आणि पोलिस प्रशासनाला सतर्क करण्यात आले.

त्यानंतर सहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार आणि पोलिस निरीक्षक किशोर शेरकी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने संबंधित परिसरात धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान १३ पैकी ११ तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मांगूर मासे आढळून आले. सायंकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावांमधून हजारो मासे बाहेर काढण्यात आले.

माशांची संख्या मोठी असल्याने जप्तीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रशासनाने ट्रॅक्टरभर मासे जप्त करत अवैध मांगूर व्यवसायाला मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

अवैध मांगूर मासेपालनाविरोधातील या व्यापक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button