अमरावतीत पावसाचा कहर! नवे अकोला गाव जलमय, नाल्यातील गाळामुळे घरात घुसले पाणी, नागरिक त्रस्त

अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. वलगाव चांदूर बाजार मार्गावरील नवे अकोला गावात गावालगत असलेला नाला सततच्या पावसामुळे दुथडी भरून वाहू लागला. मात्र या नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला आणि पाणी थेट गावात शिरले.
अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना घरातील साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. गावातील मुख्य रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याने नागरिकांचे येणे जाणेही अत्यंत कठीण झाले. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की हा नाला पुढे पेढी नदीला जाऊन मिळतो. मात्र अनेक वर्षांपासून नाल्याचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचे काम झाले नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. वेळीच नाल्याची स्वच्छता आणि खोलीकरण केले असते तर गावात पाणी शिरण्याची वेळ आली नसती, असा संतापही ग्रामस्थांनी व्यक्त केला. आता प्रशासनाने तातडीने नाल्यातील गाळ काढून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



