citynewsCrime NewsMaharashtraNagpur

हद्दपार आरोपीकडून चोरटी दारूविक्री; पोलिसांची कारवाई

यशोधरानगर चौक परिसरात गावठी हातभट्टीची दारू आणि देशी दारूचा साठा जप्त; १८ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नागपूर : शहरात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई सुरू असतानाच यशोधरानगर चौक परिसरात पोलिसांनी हद्दपार आरोपीवर कारवाई केली. आरोपी घरातून गावठी हातभट्टीची दारू आणि देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने छापा टाकून १८ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुरुवारी रात्री पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना बाबुलाल गोविंदराव हुमे हा आपल्या घरातून गावठी हातभट्टीची दारू तसेच देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत त्याच्या घराची झडती घेतली.

झडतीदरम्यान १२ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू, ९० मिलीच्या संत्रा देशी दारूच्या ५४ बाटल्या तसेच ४ हजार २१० रुपये रोख असा एकूण १८ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

विशेष म्हणजे आरोपीविरोधात यापूर्वीही अवैध दारूविक्रीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोपीला तात्पुरते नागपूर शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीच्या आदेशानंतरही तो शहरातच राहून दारूविक्री करत असल्याचे कारवाईत समोर आले.

या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम २२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button