धारणीमध्ये सहायक अभियंत्यावर १० लाख ५० हजारांची लाच मागितल्याचा आरोप

तडजोडीनंतर ९ लाखांची रक्कम ठरली; पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये स्वीकारताना एसीबीची कारवाई
अमरावती : धारणीमधून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची मोठी बातमी समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता विनोद मकरध्वज नवघरे यांच्यावर १० लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ९ लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवघरे यांना ताब्यात घेतले.
तक्रारदार हे बांधकाम कंत्राटदार तसेच बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत. धारणी तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध गावांमध्ये त्यांनी सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे तसेच साहित्याचा पुरवठा केला होता. या कामांपैकी सुमारे दीड कोटी रुपयांचे बिल मार्च २०२६ मध्ये मिळाले, तर सुमारे ८० लाख रुपयांचे बिल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणी येथील सहायक अभियंता विनोद मकरध्वज नवघरे यांनी दीड कोटी रुपयांच्या बिलाच्या रकमेच्या सात टक्के प्रमाणे १० लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली.
तक्रारीची एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. यावेळी तडजोडीनंतर ९ लाख रुपये लाच म्हणून स्वीकारण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये शासकीय निवासस्थानी स्वीकारताना नवघरे यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी धारणी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सार्वजनिक कामांच्या बिलाच्या मोबदल्यात लाच मागितल्याच्या आरोपावरून झालेल्या या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.



