दुष्काळाचे सावट, तरी दिवाळीचा उत्साह कायम!

महागाईची झळ सोसत अमरावतीकरांची खरेदीला पसंती; आकाशकंदील, तोरणे आणि पणत्यांनी बाजारपेठ सजली
अमरावती : यंदा पावसाअभावी शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले असले, तरी दीपोत्सवाच्या स्वागतासाठी अमरावतीकरांचा उत्साह कायम आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठा आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी तोरणे, मातीच्या पणत्या आणि विद्युत रोषणाईच्या साहित्याने सजल्या आहेत. सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.

यंदा बाजारपेठेत विविध आकारांच्या आणि रंगांच्या आकाशकंदिलांसह आकर्षक सजावटीच्या वस्तू उपलब्ध आहेत. महालक्ष्मीच्या मूर्ती २०० रुपयांपासून, आकाशकंदील ८० ते ५०० रुपये, तर मोत्यांची तोरणे २५० ते ८०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. याशिवाय मातीच्या पणत्या आणि लक्ष्मीच्या पावलांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने सजावटीच्या साहित्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईची झळ ग्राहकांना जाणवत असली, तरी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी नागरिक आवश्यक खरेदी करताना दिसत आहेत.
एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे महागाईचे आव्हान असतानाही दिवाळीच्या तयारीत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी अमरावतीकर बाजारपेठेत गर्दी करत आहेत. आकाशकंदील, तोरणे आणि पणत्यांच्या रोषणाईने शहरातील बाजारपेठांमध्ये दीपोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.



