गुरुकुंज मोझरीत उभी असलेली ओमनी कार आगीच्या भक्ष्यस्थानी

महावितरण कार्यालयाजवळ मध्यरात्रीची घटना; वाहन पूर्णपणे जळून खाक
प्रतिनिधी, तिवसा : तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे महावितरण कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या मारुती ओमनी कारला सोमवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली.

आगीच्या घटनेत जळालेल्या वाहनाचा क्रमांक MH 29 N 9278 असून, ते वंदना सुधीर गवई (रा. खेरी धानोरा, जिल्हा अमरावती) यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच तिवसा नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन आणि तिवसा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
दरम्यान, तिवसा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. वाहनाला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहेत.



