मेळघाटात वनहक्क दाव्यांना गती देण्यासाठी विशेष मोहीम

महसूल सेवा पंधरवड्यात जुने पुरावे व शासकीय नोंदींचे संकलन; पात्र आदिवासी लाभार्थ्यांना वनहक्क पट्टे देण्यावर प्रशासनाचा भर
धारणी : मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी महत्त्वाची बाब समोर आली असून, वनहक्काचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान महसूल सेवा पंधरवडा राबविण्यात येत असून, जुने पुरावे, शासकीय नोंदी आणि वनजमिनीवरील ताबा व वापर सिद्ध करणारी कागदपत्रे संकलित करून पात्र लाभार्थ्यांना वनहक्क पट्टे मिळवून देण्यावर प्रशासनाचा भर आहे.
या मोहिमेअंतर्गत धारणी येथील प्रशासकीय इमारतीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आणि तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली वनहक्क कायदा व नियमांबाबत मार्गदर्शन सभा घेण्यात आली. या सभेला शेकडो आदिवासी बांधव आणि भगिनी उपस्थित होते.

यावेळी प्रशासनाने वनजमिनीवरील जुना ताबा आणि वापर सिद्ध करणारे दस्तऐवज, शासकीय नोंदी तसेच उपलब्ध पुरावे सादर करण्याचे आवाहन केले. वनहक्क समिती, ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि वन विभाग यांच्या समन्वयातून प्राप्त दाव्यांची छाननी करण्यात येणार आहे.
टायगर रिझर्व्ह क्षेत्रातील लागू असलेले निर्बंध कायम ठेवून, त्याबाहेरील पात्र वनहक्क दाव्यांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ३० सप्टेंबरनंतर निश्चित होणाऱ्या वाळूगटांमधून घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक रेती उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात होणार आहे. महसूल सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून वनहक्क दावे, महसूल नोंदी, विविध दाखले आणि घरकुलाशी संबंधित प्रकरणांना गती देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
त्यामुळे पात्र आदिवासी बांधवांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले जुने पुरावे आणि आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करून या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



